Grape Farming Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची लागवड वाढली आहे. प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दशकांच्या काळात विस्तारली आहे. खरंतर फळबाग लागवड ही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारी आहे.
मात्र असे असले तरी फळबाग शेतीमध्ये अनेक आव्हाने येतात. विशेषतः द्राक्ष उत्पादनात शेतकऱ्यांसमोर वेगवेगळी आव्हाने येत आहेत. वास्तविक, द्राक्षाचे पीक उत्पादित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. हे एक खर्चिक पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती होते.
महाराष्ट्रात निर्यातक्षम द्राक्षाचे 98% उत्पादन घेतले जाते. राज्यातून दोन लाख 63 हजार मॅट्रिक टन द्राक्षाची निर्यात होते. यातून देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध होते. अशा परिस्थितीत राज्यातील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.
द्राक्ष पिकाला गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतो. यामुळे द्राक्षे पीक वाचवण्यासाठी शासनाने प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान देण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर शरद पवार यांनी राज्यातील जे द्राक्ष बागायतदार बेदाणा उत्पादन घेतात त्यांच्यासाठी बेदाणा चाळी बनवण्यास अनुदान द्यावे अशी मागणी देखील केली आहे.
अलीकडे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात बेदाणा उत्पादन घेत आहेत. प्रतिवर्षी जवळपास तीन लाख टन बेदाणा उत्पादन घेतले जाते मात्र यातून देशाची 50% बेदाण्याची गरज देखील पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत देशाची बेदाण्याची गरज भागवण्यासाठी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात बेदाणा आयात केला जातो.
यामुळे बेदाणा उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. याशिवाय बेदाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
यासोबतच बेदाणा निर्यात करण्यासाठी संस्था तयार करणे आणि राज्यात ज्या प्रमाणे कांदा चाळींसाठी अनुदान पुरवले जात आहे त्याच धरतीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाणा चाळी उभारण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.