Havaman Andaj 2023 : गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पाऊसच पडला नाही. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती होती. अनेक ठिकाणी तर पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपलीत.
मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता होती त्यांनी आपले पीक कसेबसे वाचवले. मात्र या सप्टेंबर महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी समाधानाची राहिली. कारण की या महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे पुनरागमन झाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
असे असतानाही राज्यात असेही अनेक भाग आहेत जिथे अजूनही पाऊस सुरू झालेला नाही. यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्या भागात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या नव्या बुलेटीन मध्ये पावसाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात आता येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा दावा केला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
त्यांनी सांगितले की येत्या बुधवारी म्हणजेच 6 सप्टेंबर आणि गुरुवारी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागात समाधानकारक पाऊस होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
एवढेच नाही तर 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाच्या माध्यमातून या संबंधित भागांसाठी येलो अलर्ट देखील जारी झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. विदर्भात मात्र 7 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. खरंतर महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र होत असल्याने आज पासून 8 सप्टेंबर पर्यंत अर्थातच येत्या शुक्रवार पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी झाला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे मात्र राज्यातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
काही ठिकाणी तर या सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही. मात्र आता हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने ज्या ठिकाणी या सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी देखील पाऊस पडेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.