Havaman Andaj 2023 : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा यांसारख्या राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
तर काही राज्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. आपल्या राज्यातही आगामी काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रतीचा प्रवास सुरू होणार आहे. सध्या मात्र महाराष्ट्रात मान्सून सक्रिय आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सऱ्या देखील बरसत आहे. पण काही भागात फक्त ढगांची काळी चादर पाहायला मिळत आहे.
खरंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस झाला. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही काही जिल्हे आहेत जिथे सप्टेंबर महिन्यातही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
यामुळे संबंधित भागातील शेतकरी अजूनही चिंतेतच आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सप्टेंबर मध्ये देखील चांगला पाऊस पडलेला नाही त्या भागात आता पाणी संकट उभे राहणार आहे. तिथे गुराढोरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणाऱ आहे.
अशा भागांमध्ये आगामी काळात पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या महिन्यात ज्या भागात चांगला पाऊस झाला तेथील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागातील पाणी संकट दूर झाले आहे.
अशातच आता हवामान खात्याने मान्सून बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. IMD नुसार आता मान्सून शेवटच्या टप्प्यात आला असून आगामी 48 तासात महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबई, कोकण आणि गोवा किनारपट्टी भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने कोकणासह गोव्यात पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात आगामी 48 तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये विशेषता घाटमाथ्यावर ढगाळ हवामान राहील तर काही ठिकाणी पावसाच्या सऱ्या बरसतील असा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची ये-जा अशीच सुरू राहणार आहे.
एकंदरीत राज्यातून पावसाचा जोर काहीसा कमीच झालेला आहे. दरम्यान, हवामान खात्याने 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून टप्प्याटप्प्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.