Havaman Andaj : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रावर रुसलेला मान्सून सप्टेंबर महिन्यात मनसोक्त बरसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती मात्र सप्टेंबर मध्ये सर्व दूर पाऊस बरसला असल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत. दरम्यान हवामान खात्याने ऑक्टोबरची सुरुवात पावसाने होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. IMD ने आज राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज हवामान खात्याने कोकणातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एवढेच नाही तर आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला असून या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल अशी आशंका देखील तज्ञांनी वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडतील आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
यामुळे नागरिकांनी आगामी काही तास सावध राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आज राजधानी मुंबईसह मुंबईमधील उपनगरांमध्ये देखील काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत हवामान खात्याने आज राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. यामुळे आता सरतेशेवटी राज्यातील या भागात जोरदार पाऊस होणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान यावर्षी संपूर्ण देशात आतापर्यंत सरासरीच्या 94% एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 96 टक्के एवढा पाऊस पडला आहे. अर्थातच अजूनही महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. परंतु येत्या काही दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने परतीचा पाऊस जर चांगला बरसला तर राज्यातील पावसाची सरासरी भरून निघू शकते असे मत काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.