Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मानसूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. खरे तर महाराष्ट्रात 24-25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला आहे. 25, 26 आणि 27 नोव्हेंबरला मात्र पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली.
26 नोव्हेंबरला तर राज्यातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यात सव्वीस तारखेला मोठी गारपीट झाली आणि त्या भागातील शेती पिके यामुळे भुईसपाट झाली आहेत.
परिणामी तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पण नाशिक जिल्ह्यात 28 आणि 29 हे दोन दिवस अवकाळी पावसाची तीव्रता कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
अवकाळी पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने नुकताच आपला नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल असा अंदाज आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 30 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, खान्देश विभागातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या 7 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तसेच आज उर्वरित राज्यात अगदी तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.
त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे.