Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस झाला होता. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही मध्यंतरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली होती.
यामुळे यासंबंधीत भागातील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. कोकणातील आणि विदर्भातील काढणीसाठी तयार झालेल्या भात पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.
पण आता जवळपास एका आठवड्यापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. मध्यंतरी काही ठिकाणी ढगाळ हवामान होते मात्र राज्यात गेल्या आठवडाभरापासून कुठेच अवकाळी पाऊस झालेला नाही.
शिवाय राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. यामुळे महाराष्ट्रात आता गुलाबी थंडीची चाहूल लागतं आहे. राज्यातील विविध भागांमध्ये रात्री आणि पहाटेच्या वेळी आल्हाददायक थंडीची जाणीव होऊ लागली आहे.
तसेच गेले काही दिवस राज्यातील हवामान कोरडे आहे. विशेष बाब म्हणजे आज देखील महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. आज 22 नोव्हेंबर रोजी राज्यात कुठेच पावसाची शक्यता नाहीये.
पण उद्या मात्र राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 23 अर्थातच गुरुवारी आणि 24 नोव्हेंबर रोजी अर्थातच शुक्रवारी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे आणि श्रीलंकेपासून बांग्लाच्या खाडीपर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती पाहायला मिळत आहे.
दरम्यान या दोन्ही वातावरणीय प्रणालींमुळे महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
तसेच उद्या गोव्यात देखील पाऊस पडणार असा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच 24 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने यावेळी वर्तवली आहे. यामुळे आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे विशेष लक्ष राहणार आहे.