Havaman Andaj : यावर्षी मान्सूनच्या अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा ऐरणीवर राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता. राज्यातील इतरही भागात जुलै महिन्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. हेच कारण होते की ऑगस्ट महिन्यातही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आशा होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल 26 ते 27 दिवस विश्रांती घेतली.
यामुळे खरिपातील पिके वाळली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपले. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आलेत. दरम्यान सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
मात्र राज्यात अजूनही फारसा मोठा पाऊस पाहायला मिळालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे, तरीही अजूनही राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली नाही. शिवाय ज्या भागात पाऊस पडत आहे तिथेही मुसळधार पाऊस होत नाहीये.
या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे.
यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा यंदा गोड होणार असे चित्र आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. काल उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यात पाऊस पडला आहे.