Maharashtra Havaman Andaj : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यानंतर थोडा काळ पावसाने विश्रांती घेतली. पण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली. यामुळे संबंधित भागातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे अनेक गावे जलमग्न झाली तर काही गावांचा संपर्क तुटला. मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून पुरस्थिती निर्माण झालेल्या भागात पुन्हा एकदा जनजीवन पूर्व पदावर येऊ लागले आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाकडून आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरीमध्येही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तिथेही आज पाऊस होऊ शकतो. शिवाय आज विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कोणत्याच जिल्ह्यांना रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र दोन ऑगस्ट पासून राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.
खरंतर, भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे म्हणजेच पहिला पंधरवाडा राज्यात कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता राज्यातील काही भागात दोन ऑगस्ट पासून थोडा पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता ऑगस्टमध्ये ही जुलै प्रमाणेच पावसाचा कहर पाहायला मिळणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.