Havaman Andaj : आम्ही चाललो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ! असं म्हणत आता मान्सून माघारी फिरू लागला आहे. देशभरातील विविध राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे. हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते.
यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि उत्तर भारतातील बहुतांशी राज्यांमधून मान्सून परतला आहे. आपल्या राज्यातूनही जवळपास 45 टक्क्याहून अधिक भागातून मान्सून माघारी फिरला आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आता परतीचा पाऊस देशात धुमाकूळ घालणार आहे. काही राज्यांमध्ये परतीच्या पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तवला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज अर्थातच 9 ऑक्टोबर 2023 रोजी काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यामुळे जाता-जाता मान्सून चांगलाच दणका देणार असल्याचे चित्र तयार होत आहे. दरम्यान, ज्या भागात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झालेला नाही त्या भागासाठी हा परतीचा पाऊस दिलासा देणारा राहणार आहे. खरंतर देशातील विविध भागांमध्ये परतीचा पाऊस चांगलाच बरसात आहे.
सिक्कीममध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अद्याप परतीचा पाऊस चांगला बरसलेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव थोडे चिंतेत आहेत. पण हवामान खात्याने आगामी काही तासात महाराष्ट्रात परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
कुठं बरसणार पाऊस ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, देशातील बिहार, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये परतीच्या पावसाची हजेरी लागणार आहे. आपल्या राज्यातही परतीचा पाऊस पडणार आहे.
IMD ने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, आगामी 48 तासांत देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण काही भागात फक्त ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही भागांमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे.
तसेच पुढील दोन-तीन दिवस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र या राज्यातून मान्सून पूर्णपणे माघारी फिरणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
एकंदरीत आज आणि उद्या राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो. मात्र पावसाचा जोर फारसा राहणार नाही. तसेच येत्या तीन दिवसांमध्ये राज्यातून मान्सून माघारी घेईल असे चित्र आता तयार होत आहे.