Maharashtra Rain Update : पावसाने तब्बल 15 ते 16 दिवसांच्या रजेनंतर पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाली पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे झळकू लागले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. मात्र आता खरिपातील ही पिके देखील नवीन उभारी घेण्यासाठी सज्ज झाली असून पिकांमध्ये कमालीचा टवटवीतपणा पाहायला मिळत आहे. अधिक मास मधील श्रावणात राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती.
पण निज श्रावण सुरू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र श्रावण सऱ्या बरसत आहेत. राज्यात पावसाचे कमबॅक झालेले असले तरीदेखील राज्यात कुठेच मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. राज्यात अजूनही रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. पण रिमझिम स्वरूपाचा का पाऊस होईना पण पिकांना यामुळे जीवदान मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच पुणे वेधशाळेने राज्यातील हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आगामी पाच दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात 25 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडत राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने बांधला आहे.
कोणत्या भागात पडणार पाऊस
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त आज 20 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, बीड, लातूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याव्यतिरिक्त आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उद्या संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर संबंधित विभागासाठी येलो अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात झाला मोठा बदल
उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबेचा पट्टा म्हणून हिमाचल प्रदेश मध्ये अतिवृष्टी होत होती. मात्र आता हा कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेशकडे सरकत असून यामुळे आता राज्यात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे सध्या विदर्भात पाऊस पडत असून आगामी पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र् आणि मराठवाड्यात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. राजधानी मुंबईत देखील गेल्या एक-दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईत पावसाच्या सऱ्या पडत असून गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पुन्हा दिलासा मिळू लागला आहे.