शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! एकाच वेळी मिळणार कांद्याचे अनुदान, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसा, पणन अधिकाऱ्याची माहिती 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादकांना निसर्गाचा आणि बाजारातील लहरीपणाचा कायमच फटका बसत असतो. खरंतर देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात या नगदी पिकाचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील जवळपास 60 ते 70 टक्के शेतकरी या नगदी पिकावर अवलंबून आहेत.

अशा स्थितीत, या चालू वर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजारात आलेली मंदी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडवून गेली. या चालू वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळाला होता. परिणामी त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची मागणी करण्यात आली.

ही मागणी वर्तमान शिंदे सरकारने मान्य केली. उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रतिशतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत सबसिडी देण्याची मोठी घोषणा करण्यात आली. पण अजूनही उत्पादकांना अनुदान मिळालेले नाही. दरम्यान राज्याच्या वित्त विभागाने अनुदानासाठी आवश्यक असलेल्या 857 कोटीपैकी 465 कोटी 99 लाख रुपये पणन विभागाला देऊ केले आहेत.

पण या रकमेतून राज्यातील 23 जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणे शक्य नाही. यामुळे 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के आणि दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 53% रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले होते. म्हणजे राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणार होती तर तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम दिली जाणार होती.

मात्र शेतकऱ्यांकडून या विरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. शिवाय पणन विभागाने देखील शेतकऱ्यांना एकाच वेळी रक्कम मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने महाराष्ट्र राज्य शासनाकडे संपूर्ण रकमेसाठी म्हणजेच अनुदानासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण 857 कोटी रुपयांची मागणी केली होती.

दरम्यान आता वित्त विभागाकडून येत्या दोन दिवसात ही संपूर्ण रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच राज्यातील 23 जिल्ह्यातून अनुदानासाठी सादर झालेल्या अर्जांची छाननी करून ती सॉफ्टवेअरला अपलोड करून 3 दिवसांत अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.

तसेच याबाबतचा सविस्तर असा शासन आदेश काढला जाणार आहे. तसेच हा शासन आदेश निर्गमित झाल्यानंतर पुढील सोमवारपर्यंत म्हणजेच 4 सप्टेंबर पर्यंत ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे. याचाच अर्थ राज्यातील कांदा उत्पादकांना आता अनुदानाची संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळणार असून ही रक्कम 4 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Leave a Comment