Kanda Anudan News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून कांदा अनुदान वाटपाचे सूत्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये कांद्याला खूपच कवडीमोल भाव मिळत होता. या कालावधीत कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो या दरात विकला गेला. काही बाजारात तर याहीपेक्षा कमी भाव मिळाला. वास्तविक फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही मात्र फेब्रुवारी ते मार्च या काळामध्ये बाजारातील परिस्थिती ही सर्वात बिकट होती.
अशा परिस्थितीत त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 दरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती आणि नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल एवढे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत राहून देण्याचे जाहीर केले.
याची घोषणा जरी अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली असली तरीदेखील अजूनही अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेला नाही. मध्यंतरी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पात्र शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत अनुदानाचा पैसा मिळून जाईल असे सांगितले होते. मात्र तसे काही झाले नाही.
दरम्यान आता राज्य शासनाच्या वित्त विभागाने कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेले 857 कोटी 67 लाख 58 हजार रुपयांपैकी 465 कोटी 99 लाख रुपये पणन विभागाकडे देऊ केले आहेत. म्हणजे अनुदानाचा पैसा दोन टप्प्यात वितरित होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत पणन विभागाच्या माध्यमातून राज्यातील कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेले 23 जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना हा पैसा वितरित केला जाणार आहे.
अशातच आज कांदा अनुदान वाटपाबाबत राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार आत्ता राज्यातील कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे दहा हजारापर्यंत अनुदान आहे त्यांना पूर्ण व ज्यांचे अनुदान 10,000 पेक्षा अधिक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजारापर्यंतच अनुदान आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वासिम या 14 जिल्ह्यांसाठी अनुदानाची रक्कम प्रत्येकी 10 कोटींपेक्षा कमी आहे. यामुळे या 14 जिल्ह्यांना पहिल्याच टप्प्यात शंभर टक्के रक्कम दिली जाणार आहे.
परंतु धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, अहमदनगर व नासिक या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे.