Kanda Anudan Viral News : कांदा हे एक नगदी पीक आहे. राज्यातील जवळपास 24 ते 25 जिल्ह्यात या पिकाची शेती होते. सोलापूर, पुणे, नासिक आणि अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या पिकावरच अवलंबून आहे. मात्र असे असले तरी कांदा बाजारातील लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे.
बाजारात सातत्याने चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. या दोन्ही महिन्यात बाजारात लहरीपणा पाहायला मिळाला. खरंतर जानेवारीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता.
मात्र तदनंतर बाजारभावात घसरण झाली. फेब्रुवारी महिन्यात अक्षरशः कांद्याला दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. त्यामुळे पिकासाठी आलेला उत्पादन खर्च कसा काढायचा हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाला. परिणामी त्यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक बनलेत. विरोधकांनी देखील कांद्याचा मुद्दा त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरला.
तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा करावी अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी केली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आणि एक फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल आणि प्रति शेतकरी 200 क्विंटल एवढ्या मर्यादेत अनुदान जाहीर केले.
पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी तब्बल सहा महिन्यानंतर अर्थातच पावसाळी अधिवेशनात करण्यात आली आहे. कांदा अनुदानाचा पहिला टप्पा नुकताच वितरित करण्यात आला आहे. या कांदा अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळाले आहे तर दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजारापर्यंतचे अनुदान मिळणार आहे आणि उर्वरित अनुदान दुसऱ्या टप्प्यात दिले जाणार आहे.
बैलपोळ्याच्या सणापूर्वी आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शासनाने कांदा अनुदानाचा पहिला टप्पा वितरित केला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा दावा केला जात आहे. अशातच मात्र कांदा अनुदानसंदर्भात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील एका शेतकऱ्यांना कांदा अनुदानाच्या मोबदल्या केवळ 252 मिळाले आहेत.
सतीश गुंजाळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सतीश गुंजाळ यांनी 112 क्विंटल आणि 90 किलो कांद्याची विक्री केली आहे. म्हणजे जवळपास 113 क्विंटल कांदा त्यांनी विकला आहे. यामुळे 350 रुपये प्रति क्विंटल नुसारं गुंजाळ यांना चाळीस हजार रुपये मिळणे अपेक्षित होते.
नाशिक जिल्ह्याला दोन टप्प्यात रक्कम मिळणार असल्याने पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये त्यांना येणे अपेक्षित होते. मात्र गुंजाळ यांना केवळ 252 रुपये आणि 50 पैसे एवढे पैसे अनुदान स्वरूपात मिळाले आहेत. यामुळे सध्या शासनाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक बनले आहेत. मायबाप शासन बळीराजाची क्रूर चेष्टा करत असल्याचे बोलले जात असून शासन अनुदान देतेय की भीक देतेय असा संतप्त सवाल देखील आता येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.