Kanda Market Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सऱ्या बरसत आहेत. यामुळे ज्या भागात मान्सून सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटत आला तरीही पाऊस झालेला नव्हता त्या भागात समाधान व्यक्त केले जात आहे.
तर दुसरीकडे सध्या कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती देखील तयार झाली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच मात्र राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांदा दरातील तेजी अजूनही कायमच आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काही प्रमुख बाजारात कांद्याला चांगला विक्रमी दर नमूद करण्यात आला आहे. आज राज्यातील एका बाजारात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. सध्या मिळत असलेल्या या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
खरंतर शेतकऱ्यांनी या चालू वर्षी जवळपास पाच ते सहा महिने कांदा अतिशय कवडीमोल भावात विकला आहे. अशा परिस्थितीत सध्या बाजारात तेजी आली असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत झालेल्या लिलावात राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे.
या बाजारात आज कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून किमान 1200 आणि सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे. तसेच आज पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वोच्च दर नमूद करण्यात आला आहे.
या बाजारात आज 31 हजार 900 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या बाजारात आज कांद्याला किमान 300, कमाल 2701 आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे.
सरासरी बाजार भावही वाढले
खरंतर, जुलै महिन्यात कांद्याच्या दरात वाढ झाली. मात्र कमाल बाजार भाव आतच वाढ होत होती सरासरी बाजार भाव 1000 ते 1500 प्रतिक्विंटल पर्यंतच होते. आज मात्र सरासरी बाजार भाव देखील चांगली वाढ झाली आहे. आज राज्यातील विविध बाजारात सरासरी दर 1000 रुपये प्रति क्विंटल पासून ते 2 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद करण्यात आले आहेत.