LPG Gas Cylinder : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना हाती घेतल्यानंतर गॅस लाभार्थी वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर होऊ लागला आहे.
यामुळे चुलीच्या धुरीने त्रस्त महिलांना दिलासा मिळाला आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर अनुदान देखील दिले जात आहे.
गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी तीनशे रुपये प्रति सिलेंडर एवढे अनुदान दिले जात आहे. यामुळे उज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान आज आपण एका आर्थिक वर्षात एका ग्राहकाला किती गॅस सिलेंडर मिळू शकतात ? तेल कंपन्यांनी याबाबत काय नियम तयार केले आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
एका आर्थिक वर्षात किती सिलेंडर मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्या बारा महिन्यात बारा गॅस सिलेंडर देतात. म्हणजे एका महिन्याला एक गॅस सिलेंडर मिळते. परंतु जर तुम्हाला यापेक्षा अधिक गॅस सिलेंडरची गरज भासली तर कंपनीच्या माध्यमातून अतिरिक्त तीन गॅस सिलेंडर दिले जाऊ शकतात.
म्हणजे एका आर्थिक वर्षात टोटल 15 गॅस सिलेंडर मिळू शकतात. पण अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या तीन गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळणार नाही. म्हणजे ज्यांना सबसिडीचा लाभ मिळत आहे त्या ग्राहकांना एका आर्थिक वर्षात फक्त 12 सिलेंडरवर सबसिडी मिळू शकणार आहे.
एका गॅस कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळतील. म्हणजे संपूर्ण वर्षभरात फक्त 213 किलो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) उपलब्ध होईल, असा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.
इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी एका ग्राहकाला एका आर्थिक वर्षात 15 गॅस सिलेंडर मिळू शकतात. म्हणजेच एका आर्थिक वर्षात 14.2 किलोग्रॅम चे एकूण 15 गॅस सिलेंडर असे एकूण 213 किलो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस एका ग्राहकाला देण्याचा निर्णय झालेला आहे.
अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखले जात आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कामांसाठी वापर होऊ नये यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
समजा एखाद्या ग्राहकाला वर्षाला 15 सिलेंडर पुरत नसतील मग त्याने काय करावे? तुम्हाला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर अशा ग्राहकाने घरात खप जास्त असल्याने दुसरे कनेक्शन घ्यावे असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.