Maharashtra Cyclone News : मान्सून 2024 आगमनाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या दोन दिवसात मान्सूनचे अंदमानात आगमन होण्याची शक्यता आहे. यानंतर 11 ते 12 दिवसांनी अर्थातच 31 मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थात तळ कोकणात देखील वेळेतच म्हणजेच 7 जूनच्या सुमारास आगमन होऊ शकते असे म्हटले जात आहे.
मान्सून आगमनापूर्वी मात्र महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. या वादळाचा प्रभाव 23 मे ते 27 मे दरम्यान पाहायला मिळू शकतो.
तसेच याचा महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरात या राज्यांना फटका बसू शकतो. या चक्रीवादळामुळे 28 मे च्या सुमारास गुजरात आणि मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. हे चक्रीवादळ हळूहळू तीव्र होत आहे.
विशेष म्हणजे पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी हे वादळ पूर्वेकडील किनारपट्टीला धडकणार असून याचा प्रभाव देशातील अनेक राज्यांवर पाहायला मिळू शकतो. काही हवामान तज्ञांनी 24 मे नंतर या चक्रीवादळाची ताकद वाढू शकते असे म्हटले आहे.
परंतु हवामान खात्याने अजूनही हे चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही. त्यामुळे हे चक्रीवादळ तयार झाले तरी देखील याचा फारसा विपरीत परिणाम पाहायला मिळणार नाही अशी आशा आहे.
दुसरीकडे हवामान विभागाने 23 मे पर्यंत देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने नुकताच जारी केला आहे.
आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये आगामी सात दिवस उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळ, विजा आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच या कालावधीत या संबंधित भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असाही अंदाज समोर आला आहे. एवढेच नाही तर तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये 23 मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर गेल्या 11 ते 12 दिवसांपासून राज्यात पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे आजही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.