MSRDC महाराष्ट्रात तयार करणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग, लोकसभा निवडणुकीनंतर सुरु होणार बांधकाम, कसा असणार रूटमॅप ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्गाची आणि रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकास अन इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात महाराष्ट्रात चांगली नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळत आहे. शासन आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीमुळे आता महाराष्ट्रात रस्ते प्रवास आधीच्या तुलनेत अधिक चांगला झाला आहे. राज्यात समृद्धी महामार्ग सारख्या हायटेक महामार्गाची उभारणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. तसेच, उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात आणखी काही नवीन महामार्गाची उभारणी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात पुणे रिंग रोड, विरार-अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्गाचा विस्तारित मार्ग अर्थात जालना-नांदेड समृद्धी महामार्ग विकसित होणार आहेत.

विशेष म्हणजे या महामार्गाच्या कामासाठी सध्या स्थितीला निविदा प्रक्रिया सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य रस्ते विकास महामंडळाने या तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. या तिन्ही प्रकल्पांचे काम 26 पॅकेज मध्ये होणार असून यासाठी 82 निविदा दाखल झाल्या आहेत.

खरंतर या प्रकल्पासाठी आधी इच्छुक कंपन्याकडून स्वारस्य निविदा मागवल्यात. यात 19 कंपन्या पात्र ठरला. दरम्यान याच 19 कंपन्यांनी आता तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठी 82 निविदा सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे या तांत्रिक निविदा गुरुवारी खुल्या झाल्या आहेत. एका पॅकेजच्या कामासाठी तीन ते पाच कंपन्यांनी निविदा दिल्या आहेत.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग : या अंतर्गत 128 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 96 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर ते पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावादरम्यान पहिल्या टप्प्यातला मार्ग विकसित होणार आहे. याचे काम एकूण 11 पॅकेज मध्ये होणार असून यासाठी 60,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

पुणे रिंग रोड : पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फुटणार अशी आशा आहे.

हा प्रकल्प जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाला देखील चालना देणारा राहील असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यात 136 किलोमीटर लांबीचे काम होणार आहे आणि हे काम 9 पॅकेज मध्ये केले जाईल. याच्या बांधकामासाठी 16000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग : समृद्धी महामार्गाचा विस्तारित टप्पा म्हणून जालना ते नांदेड दरम्यान १९० किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग विकसित होणार आहे. या महामार्गामुळे समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेड पर्यंत होणार आहे.

हा महामार्ग मराठवाड्यातील विकासाला चालना देणार असा विश्वास व्यक्त होतोय. दरम्यान या १९० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम एकूण सहा पॅकेज मध्ये पूर्ण केले जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असे बोलले जात आहे. 

Leave a Comment