Maharashtra Farmer Scheme : काल अर्थातच 4 डिसेंबर 2023 पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सत्ता पक्षांत आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, लोकसभेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे.
सुप्रिया सुळे यांनी काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मोठी मागणी केली आहे.
सुळे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत. खासदार महोदय यांनी यावेळी लोकसभेत राज्यातील काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ पडला असल्याचे सांगितले.
तसेच या ओला आणि कोरड्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. अशा स्थितीत केंद्राने एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाठवावे आणि पाहणी करून तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली आहे.
यावेळी खासदार महोदया यांनी राज्यातील संपूर्ण कष्टकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यामुळे आता केंद्राकडून सुळे यांच्या या मागणीची दखल घेतली जाते का आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खरे तर, राज्यातील शिंदे सरकारने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या संबंधित भागात आता दुष्काळी सवलती लागू केल्या जाणार आहेत.
याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा ज्या भागाला फटका बसला आहे तेथे तात्काळ पंचनामे करून शिंदे सरकारने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देखील संबंधितांना दिल्या आहेत.
अशातच, आता सुळे यांनी केंद्रीय स्तरावरून महाराष्ट्राला मदत पुरवली गेली पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांना नवीन कर्ज दिले पाहिजे अशी मागणी यावेळी केली आहे.