Maharashtra Farmer Scheme : आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळीची भेट मिळणार आहे. आज राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही वर्तमान शिंदे सरकारने जाहीर केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे.
ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. पी एम किसान प्रमाणेच या योजनेअंतर्गत दिले जाणारे सहा हजार रुपये हे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात मिळणार आहेत. चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी राज्य शासनाने 1720 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आज नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. आज पीएम मोदी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी दौऱ्यावर आहे.
या दौऱ्या दरम्यानच या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन आहे. या निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल देखील महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ
या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नमो शेतकरी चा पहिला हप्ता हा राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना मिळेल असे सांगितले जात आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहे. पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण बारा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
पीएम किसानचा 15 वा हफ्ता केव्हा मिळणार?
आज नमो शेतकरीचा पहिला हप्ता वितरित होणार आहे. या योजनेअंतर्गत आज पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सोमवार पर्यंत जमा होईल अशी माहिती समोर आली आहे.
याशिवाय पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा देखील दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 4000 रुपयांची भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे.