Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. राज्यातील बहुतांशी लोकांचा शेती हा उदरनिर्वाहासाठीचा मुख्य व्यवसाय आहे.
हेच कारण आहे की, राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना लाभान्वित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असतो. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अर्थसंकल्प 2023-24 मध्ये वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना या योजनेची सुरुवात केली आहे.
दरम्यान, याच राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहे. खरंतर, या राज्य शासनाच्या नवीन योजनेची सुरुवात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. पीएम किसान अंतर्गत ज्याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत त्याचप्रमाणे नमो किसान अंतर्गत देखील सहा हजार रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यात दिले जाणार आहेत. आता या योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विजयादशमी नंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे होणाऱ्या एका कार्यक्रमादरम्यान या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार समवेत संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची हजेरी राहणार आहे.
पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटींची तरतूद !
नमो शेतकरीचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हा निधी राज्य शासनाकडून राज्याच्या कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
दरम्यान आता या योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.