Maharashtra Government Employee : सणासुदीच्या काळात शासनाकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. आगामी निवडणुकीचा काळ पाहता शासनाच्या ( Maharashtra Government ) माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी देखील शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी ( Employee ) देखील अनेक महत्त्वाचे निर्णय गेल्या काही महिन्यांच्या काळात शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत.
अशातच आता शिंदे सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे राज्यात कार्यरत असलेल्या 80 हजार आशा स्वयंसेविकांबाबत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 80 हजार आशा स्वयंसेविकेचे मानधन आता 7 हजार रुपयांनी वाढणार आहे. एवढेच नाहीतर राज्यात कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांना देखील 6,200 रुपयांची मानधन वाढ दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनातील आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आशा स्वयंसेविकांना दिवाळी बोनस देखील मिळणार आहे.
यंदा आशा स्वयंसेविकांना दोन हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाणार अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. खरतर नुकतेच शिंदे सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांना, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता आशा स्वयंसेविकांना देखील मानधन वाढीसोबतच दिवाळी बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आता आपण मानधनवाढ लागू झाल्यानंतर राज्यातील आशा स्वयंसेविकांना किती मानधन मिळेल याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती मानधन मिळणार ?
आशा सेविकांना आत्तापर्यंत केंद्रस्तरावरून तीन हजार रुपये आणि राज्यस्तरावरून पाच हजार रुपये असे एकूण आठ हजार रुपये मानधन म्हणून मिळत होते.
पण आता यामध्ये सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ राज्यातील आशा सेविकांना आता प्रतिमहिना 15,000 रुपयाचे एकत्रित मानधन मिळणार आहे.
गट प्रवर्तकांना किती मानधन मिळणार ?
सध्या गट प्रवर्तकांना केंद्र स्तरावरून 8,775 रुपये मानधन मिळत आहे आणि राज्य शासनाकडून 6200 दिले जात आहेत. म्हणजेच आतापर्यंत गटप्रवर्तकांना 14975 रुपये प्रति महिना मानधन मिळत होते. पण आता यामध्ये 6200 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच आता या संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन 21,175 रुपये एवढे होणार आहे.