Maharashtra Havaman Andaj : जुलै महिन्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रसह उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यात मोठी विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिना येत्या काही दिवसात संपणार आहे.
एकीकडे महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे, म्हणजे मान्सून संपण्याच्याच मार्गावर आहे तर दुसरीकडे महिन्याच्या सुरुवातीपासून गायब झालेला पाऊस महिना अखेरला पण बरसणार नसल्याचे सांगितले जात आहे. या चालू महिन्यात महाराष्ट्रात कुठेच दमदार पाऊस होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस होईल असा अंदाज मात्र आहे. या महिन्याच्या सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता. सुरुवातीचे चार दिवस मध्यम पावसाचे होते. यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात देखील चांगल्या पावसाची शक्यता वाटत होती.
मात्र तसे काही झाले नाही, मध्यंतरी चार दिवस वगळता राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडला नाही. 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडला होता. उर्वरित महाराष्ट्रात याही कालावधीत कोरडच पाहायला मिळाली.
यामुळे शेतकरी राजा आता ऑगस्ट महिना तर कोरडा गेला पण सप्टेंबर महिन्यात काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत आणि जोरदार पावसासाठी वरुणराजाला साकडे घालत आहेत. दरम्यान जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे नजरा टेकून बसलेल्या बळीराजासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सप्टेंबर महिना देखील कोरडा जाणार अशी शक्यता आहे.
सात सप्टेंबर नंतर राज्यात ढगाळ वातावरण किंवा किरकोळ पाऊस पडेल असं सांगितलं जात आहे. चिंताजनक म्हणजे एल निनो सध्या सुप्त अवस्थेत आहे. मात्र तरीही मान्सूनसाठी, जोरदार पावसासाठी कोणतीही वातावरणीय प्रणाली पूरक ठरत नाहीये. यामुळे सप्टेंबर महिन्यातही मोठा पाऊस पडणार नाही अशी भीती काही तज्ञांना वाटत आहे.
दरम्यान सप्टेंबर महिन्यात जर मोठा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जनावरांना चारा उपलब्ध राहणार नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. काही हवामान तज्ञांनी सध्या एल निनो सुप्त अवस्थेत आहे मात्र याचा प्रभाव पुढे वाढेल आणि असं झालं तर सप्टेंबर महिन्यातही जोरदार पावसाची शक्यता फोल ठरेल असा अंदाज वर्तवला आहे.