Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची अगदी ज्याप्रमाणे चातक पक्षी माणसाच्या सुरुवातीला वाट पाहतो तशी शेतकरी राया पावसाची वाट पाहत होता.
मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व समाधान पाहायला मिळत आहे. कारण की गेला संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला होता. संपूर्ण महिना पाऊसच पडला नाही यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळू लागली होती.
यामुळे बळीराजा हवालदिल झाला होता. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक फक्त आणि फक्त पाऊस नसल्याने वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत होती. मात्र आता पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असेल आणि खरिपातील पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे.
काही शेतकऱ्यांची पिके मात्र वाया गेली आहेत. दरम्यान आता राज्यात पावसाला सुरुवात झाली असून आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या तज्ञांनी आगामी काही दिवसाच्या हवामानाबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाली असल्याने येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.
या प्रणालीचा मात्र राज्याला फायदा होणार आणि पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे. 5 सप्टेंबर पर्यंत कोकण आणि गोव्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाच ते सात सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता यावेळी होसाळीकर यांनी वर्तवली आहे.