Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
वास्तविक डिसेंबर महिना सुरू झाला की कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते. मात्र यंदा डिसेंबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू आहे की, हिवाळा हा मोठा प्रश्न आहे.
राज्यात आता पावसाची तीव्रता कमी झालेली असली तरी देखील अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे. आज मात्र उर्वरित महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
दुसरीकडे दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे तांडव सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित झाल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात नवीन मिचांग चक्रीवादळ तयार झाले असून तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र किनारपट्टीवर याचा प्रभाव दिसणार आहे. याच्या प्रभावामुळे तामिळनाडू, दक्षिण किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यासोबतच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील देशातील काही राज्यांमध्ये आगामी काही दिवस पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे.
कुठं बरसणार पाऊस ?
Skymet ने सांगितल्याप्रमाणे, पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
एवढेच नाही तर देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.