Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही दशकांमध्ये हवामान बदलाचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. मान्सून काळात कमी कालावधीत अधिक पाऊस पडत आहे. मानसून काळातील पावसाचे दिवस कमी झाले आहेत. पावसाचे मोठे असमान वितरण देखील पाहायला मिळत आहे.
यावर्षी देखील पावसाचे असमान वितरण आपल्या देशात पाहायला मिळाले आहे. राज्यातही काही ठिकाणी तीव्र दुष्काळाच्या झळा बसल्यात तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यंदा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
बोटावर मोजण्या इतके भाग सोडले तर कुठेच समाधानकारक असा पाऊस झालेला नाहीये. राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे खरिपातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये शिवाय रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे.
वास्तविक गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. हा अवेळी पडणारा पाऊस पिकांसाठी घातक ठरतो. पण यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने अवकाळी पाऊस का होईना बरसला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जर यंदा अवकाळी पाऊस बरसला नाही तर गुराढोरांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला नाही पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना भटकंती करावी लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? अवकाळी पाऊस पडणार का याबाबत माहिती दिली आहे.
कसं राहणार राज्यातील हवामान ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार नाही. यामुळे यंदा महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. खरंतर सध्या अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळ सक्रिय आहे शिवाय बंगालच्या खाडीत हामुन चक्रीवादळ सक्रिय होत आहे.
पण, या दोन्ही चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कोणताच विपरीत परिणाम पाहायला मिळणार नाहीये. राज्यात या चक्रीवादळामुळे पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याने आधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय होणार आहे.
तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ईशान्य मान्सून कार्यरत असतो. यावर्षी मात्र ईशान्य मान्सून काळात देखील सरासरीइतकाच पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.