Maharashtra Havaman Andaj : गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त जुलैच्या महिन्यातच चांगला पाऊस झाला आहे. यामुळे साहजिकच राज्यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी संकटात आली होती.
अनेक ठिकाणी शेती पिके करपली होती. फक्त ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांनी कसेबसे आपले पीक वाचवले होते. पण आता सप्टेंबर महिन्यात पावसाची पुन्हा एकदा वापसी झाली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतीपिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळाले आहे. वास्तविक, या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाले.
मात्र पावसाचा खरा जोर वाढला तो सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात. सात सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर पावसाची हजेरी लागली. सात सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसलधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. या पावसामुळे अनेक भागात विहिरींना देखील चांगले पाणी उतरले आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच राज्यात दर्श पिठोरी अमावस्या अर्थातच बैलपोळ्याला पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. दरवर्षी बैलपोळ्याला पावसाची हजेरी लागते. यामुळे यंदाही बैलपोळ्यात पाऊस पडणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात होता.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने 14 सप्टेंबर रोजी अर्थातच बैलपोळ्याला देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कृष्णानंदजी यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत मध्य भारतासह महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. सोबतच पुढील चार आठवडे राज्यात पावसाची अशीच शक्यता कायम राहणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट या चालू महिन्यातून भरून निघेल असा आशावाद व्यक्त होत आहे.