Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाऊस सुट्टीवर गेला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बहुतांशी भागातील खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
या अवस्थेत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आतुरता लागून आहे. पण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नाहीये. भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असल्याने महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली असल्याचे स्पष्ट केले आहे.
पण महाराष्ट्रात पावसाची उघडीप असली तरी उत्तराखंडपासून ते लगतच्या प्रदेशात या हवामान प्रणालीमुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंड मधील अनेक भागात जास्तीच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासाकांनी महाराष्ट्रात किती दिवस पावसाची उघडीप राहणार, राज्यात जोरदार पावसाला केव्हा सुरुवात होणार आहे याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 ऑगस्ट पर्यंत पावसाची सुट्टी राहणार आहे. मात्र 20 ऑगस्ट नंतर कदाचित पावसाचा जोर वाढेल असं मत हवामान तज्ञांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. राज्यातील कोकण आणि विदर्भ या दोन विभागात जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.
कोकणातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत होत्या एवढेच नाही तर काही प्रमुख नद्यांना पूर देखील आला होता. यामुळे कोकणातही सामान्य जनजीवन जुलै महिन्यात विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता मात्र गेल्या 12 ते 13 दिवसांपासून कोकण, विदर्भसहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाची मोठी तुट आहे. म्हणून या जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.