Maharashtra Havaman Andaj : जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता जून महिन्यात कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत होते. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला हवामान खात्याने जुलैमध्ये जोरदार पाऊस होणार असे सांगितले. मात्र जुलैची सुरुवात ही सुद्धा निराशाजनक राहिली. पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु होता. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.
पुणे, कोल्हापूर या ठिकाणी पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती बनली आणि यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. मात्र आता कालपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पूरस्थिती देखील निवळली आहे.
परिणामी सर्वसामान्य जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधून पाऊस ओसरला आहे. मात्र, पूरस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांमधील शेती पिकांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तर अगदीच एखाद-दोन ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून यासंबंधीत जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज कोकण, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या भागासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मुंबई सह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
याशिवाय सोमवारपासून बुधवारपर्यंत विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय, या काळात उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे.