Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानातं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. हवामानातील लहरीपणा राज्यातील शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढवत आहे. काल राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 26 नोव्हेंबरला धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले.
विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव संकटात आले आहेत.
खरे तर भारतीय हवामान विभागाने 25, 26, 27 आणि 28 नोव्हेंबरला राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली होती. यानुसार काल राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस बसला आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा फटका बसला आहे. अर्थातच हवामान विभागाचा हवामान अंदाज खरा ठरला आहे.
पण यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली असून आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ?
ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, आज 27 नोव्हेंबरला संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
28 नोव्हेंबरला मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर किंचित कमी होणार. या दिवशी फक्त विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवशी उर्वरित महाराष्ट्रात मात्र अगदी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच 28 तारखेला महाराष्ट्रात कुठेच गारपिटीचा इशारा देण्यात आलेला नाही.
29 नोव्हेंबरला विदर्भात देखील खूपच किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील आणि अगदीच कुठेतरी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 तारखेला सुद्धा कुठेच गारपीट होणार नाही.
30 तारखेला देखील 29 नोव्हेंबर प्रमाणेच महाराष्ट्र भर ढगाळ हवामान राहील. तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल. कुठेच गारपीट होणार नाही.
एक डिसेंबरला तयार झालेले हे अवकाळी पावसाचे वातावरण निवळेल अशी आशा आहे.
2 डिसेंबरला महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळेल आणि हळूहळू थंडीकडे वाटचाल सुरू होईल अशी शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.