Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात या हंगामातील तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. याला मिचँग असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावाखाली देशातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
या वादळाच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. वास्तविक या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नव्हता.
पण हे वादळ हवेतील ओलावा पूर्व विदर्भापर्यंत पोहोचवणार असल्याने आता राज्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढणार आहे. गेल्या महिन्यात राज्यात अरबी समुद्रा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस झाला होता.
आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला.
या चालू महिन्यात मात्र पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. परंतु अजूनही अवकाळी पावसाचे राज्यावर सावट आहे. आता सहा आणि सात डिसेंबरला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील विदर्भ विभागातील जवळपास सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज IMD ने दिला आहे. दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील २-३ दिवसांसाठी पुढे ढकलावीत असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.