Maharashtra Havaman Andaj : गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. काही ठिकाणी तर गारपीट देखील झाली आहे. गारपिटीमुळे विविध भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे या गारपिटीने सर्वाधिक नुकसान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही भागात गारपीट झाली आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
याशिवाय पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झाला आहे. हा अवकाळी पाऊस मात्र फळबाग पिकांसाठी मोठा घातक ठरणार आहे.
तथापि या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना थोडासा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 27 नोव्हेंबर रोजी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात मात्र जोरदार वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांना पावसाचा अंदाज पाहूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कुठं पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या तीन जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला असून या संबंधित भागांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांसाठी देखील आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे आज या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.