Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिना संपला अर्थातच मान्सूनच्या तीन महिन्यांचा काळही संपला आहे. आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. हा मान्सूनचा शेवटचा महिना राहणार आहे. पण गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपैकी फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली होती. यामुळे या तीन महिन्याच्या काळात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तर तब्बल 25 ते 26 दिवस पावसाचा खंड पाहायला मिळाला आहे. एकूणच ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत.
खरीप हंगामातील पिके करपली आहेत. शिवाय गेला महिना कोरडा गेल्याने सप्टेंबर महिना देखील कोरडा जाईल की काय अशी भीती सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे. तज्ञ लोकांच्या मते जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे.
अशातच सप्टेंबर महिन्यातील हवामानाबाबत, पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. IMD ने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार या चालू सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यासह महिन्याच्या मध्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे.
यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. आता सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस होतो, भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का याकडे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेचे विशेष लक्ष राहणार आहे.
काय म्हणताय तज्ञ
भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी देखील सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या महिन्यात जास्त पाऊस पडला तरीही यंदाच्या पावसाळ्याची सरासरी गाठणे अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या व्यतिरिक्त हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यात सात सप्टेंबर पर्यंत किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र सप्टेंबरच्या मध्यात मध्य, दक्षिण द्वीपकल्प, मराठवाडा कोकण गोव्यासह मध्य भारतातील काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.