Maharashtra Monsoon News : यावर्षी उशिराने दाखल झालेला मान्सून कुठे सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस तर कुठे सरासरीपेक्षा कमी पाऊस देऊन आता परतू लागला आहे. महाराष्ट्रातही तो परतीचा प्रवास सुरू करण्यास सज्ज झाला आहे. हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मानसूनचा परतीच्या प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरंतर, यावर्षी मान्सून महाराष्ट्रात खूपच उशिराने दाखल झाला. राज्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर मान्सून दाखल झाला. यामुळे महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर परिस्थिती बदलली आणि जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली.
यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. परंतु ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने मोठा खंड पाडला. यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाण्याचे संकट उभे झाले. विशेष म्हणजे सप्टेंबर मध्ये जर पाऊस पडला नसता तर कदाचित महाराष्ट्र हा आतापर्यंतच्या सर्वात भयानक दुष्काळामध्ये सापडला असता.
मात्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला आणि यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या विळख्यातून बाहेर पडला. पण असे असले तरी राज्यातील काही भागात आता मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे आणि अजूनही राज्यातील काही भागात समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील दक्षिण मध्य भाग वगळता उर्वरित भागातून मान्सून परतणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सून माघारी फिरणार असल्याचे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या 24 तासात पावसाची शक्यता नाही. परिणामी या संबंधित भागातून येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
मात्र दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या भागातून मान्सून 10 ऑक्टोबर पर्यंत माघारी फिरणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातून दहा ते अकरा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरू शकतो.