Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यासाठी केंद्र शासनाने भारतमाला परियोजना राबवली आहे. या भारतमाला परियोजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्ग विकसित केली जात आहेत. दरम्यान या परियोजने अंतर्गत नागपूर ते विजयवाडा दरम्यान नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे विकसित केला जाणार आहे.
हा महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच विकसित होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर हे अंतर कमी करण्यासाठी आणि या दोन्ही शहरांमधील प्रवास गतिमान करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे.
अर्थातच या रस्त्याचे आणखी 101 किलोमीटर लांबीचे काम बाकी आहे. सध्या स्थितीला नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान भरवीर ते मुंबई पर्यंतचे काम येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी हा संपूर्ण महामार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
अशातच आता नागपूर ते विजयवाडा असा नवीन चार पदरी समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. हा मार्ग आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांना जोडेल आणि याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केले जाणार आहे. या मार्गासाठी लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
कारण की, 457 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील संभाव्य शेत जमिनीचा ड्रोनने सर्वे सुरू करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर या तीन तालुक्यांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी एकूण 14,666 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
हा महामार्ग 457 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 310 किलोमीटरचा मार्ग ब्राऊन फील्ड आणि 108 किलोमीटरचा मार्ग ग्रीन फील्ड राहणार आहे. मंचरियल ते वारंगल या दरम्यानच्या 108 किलोमीटरच्या ग्रीन फिल्ड महामार्गावर जवळपास 2500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या नागपूर ते विजयवाडा अंतर 770 किलोमीटर एवढे आहे.
विशेष म्हणजे सध्या स्थितीला हा प्रवास करण्यासाठी 13 तासांचा कालावधी लागत आहे. मात्र नागपूर ते विजयवाडा समृद्धी महामार्ग तयार झाल्यानंतर 770 किलोमीटरचे अंतर थेट 457 किलोमीटरवर येणार आहे. तसेच 13 तासांचा हा प्रवासाचा कालावधी फक्त 5 ते 6 तासांवर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डी पी आर तयार झाला आहे परंतु हा डीपीआर अजून NHI ने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये हा डी पी आर ऑनलाइन उपलब्ध होईल अशी माहिती समोर येत आहे तसेच हा मार्ग 2027 पर्यंत बांधून प्रवाशांसाठी सुरू होणार असा दावा देखील केला जात आहे.