Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही कित्येक रस्ते विकास प्रकल्पांची कामे विविध टप्प्यात आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
कोकणात जाणाऱ्यां प्रवाशांना अगदी तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने कोकणवासीयांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
मात्र भविष्यात मुंबईहुन कोकणात जाणाऱ्यांचा अन कोकणातून मुंबईत येणाऱ्यांचा प्रवास जलद होणार आहे. कारण की मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी भविष्यात दोन नवीन महामार्ग तयार केले जाणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग आणि कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर सागरी किनारा महामार्ग तयार केला जाणार आहे. दरम्यान याच सागरी किनारा महामार्ग संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेवस ते रेड्डीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील खाड्यांवरील चार पुलांच्या कामासाठी निविदा मागवल्या गेल्या होत्या.
दरम्यान या संबंधित खाडी पूलांसाठी चार कंपन्यांनी नऊ निविदा सादर केल्या असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समोर आली आहे.
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, अशोका बिल्डकॉन, विजय एम.मिस्त्री कन्स्ट्रक्शन आणि टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या कंपन्यांनी या कामासाठी निविदा सादर केली आहे.
अर्थातच या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्यात आहे. खरे तर या 447 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील कुंडलिका, काळबादेवी, जयगड आणि कुणकेश्वर येथे पुलांच्या उभारणीसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसहितापूर्वीच म्हणजे मार्च महिन्यात निविदा मागविल्या होत्या.
यानुसार इच्छुक कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. आता या तांत्रिक निविदा बुधवारी खुल्या करण्यात आल्या आहेत. खरंतर या प्रकल्पांतर्गत आठ ठिकाणी खाडी पूल आणि दोन उड्डाणपूल तयार होणार आहेत.
या प्रकल्पातून कोकणातील जवळपास 93 महत्त्वाचा पर्यटन स्थळांना जोडले जाणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना तर दिलासा मिळणारच आहे शिवाय कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास देखील सुपरफास्ट होणार आहे.