Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर शासनाने अधिक भर दिला असून यामुळे आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात भारतमाला परियोजना अंतर्गत महामार्गाचे जाळे विणले जात आहे. या परियोजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांची कामे सुरू आहेत.
यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अजूनही सुरू आहेत. विशेष म्हणजे ही सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडोर आहेत. दरम्यान भारतमाला परियोजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
या अंतर्गत राज्यासहित संपूर्ण देशभरात हजारो किलोमीटरचे महामार्ग तयार होणार आहेत. या अंतर्गत छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा हरीत महामार्ग तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षांपूर्वी ही घोषणा झाली.
दरम्यान याच प्रस्तावित महामार्ग संदर्भात नुकतीच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. या महामार्गाला आता मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे.
मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, या महामार्गाला आता मंजुरी मिळाली असून हा मार्ग बीओटीवर बांधला जाईल असे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, हा रस्ता महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित केला जाईल.
यासाठी हुडको कडून तीन हजार कोटींचे कर्ज उपलब्ध होईल. येत्या दोन दिवसात याबाबतच्या निर्णयाची प्रत मुंबई व क्षत्रिय कार्यालयाकडे सोपवली जाणार अशी महत्त्वाची माहिती मंत्री महोदय यांनी यावेळी दिली आहे.
कसा असेल मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील 17 आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सात गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास फक्त आणि फक्त दोन ते सव्वा दोन तासात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या मार्गाचे अलाइनमेंट देखील फायनल करण्यात आले आहे. या मार्गावर छत्रपती संभाजीनगर ते शिरूर यादरम्यान दोन टोलनाके विकसित होणार आहेत. तसेच टोल मधून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून छत्रपती संभाजी नगर – अहमदनगर – पुणे हा जुना मार्ग देखील दुरुस्त केला जाईल, जुना मार्ग देखील चांगला बनवला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
या मार्गामुळे नागपूर ते पुणे हा प्रवास देखील चार तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नागपूर ते जालना समृद्धी महामार्गाने व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन मार्गाने प्रवास केल्यास प्रवाशांना अवघ्या चार तासात नागपूर ते पुणे असा प्रवास करता येणार आहे.