Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्यांसंदर्भात विशेष चर्चा पाहयाला मिळत आहेत. टोलनाक्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उतरले आहेत. त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावर नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या समवेत बैठक घेतली होती.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला टोलनाक्यासंदर्भातील काही नियमांची आठवण करून दिली होती. शिवाय टोलनाक्यासंदर्भात जर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर मनसे आक्रमक भूमिका घेणार असे देखील सांगितले होते. दरम्यान ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार आता टोलनाक्यासंदर्भात कामाला लागले आहे.
यानुसार आता जर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजे एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील कोणत्याही टोल नाक्यावर चार मिनिटांच्या आत जर वाहनचालकांकडून टोलची रक्कम वसूल झाली नाही तर अशा गाड्यांना टोल द्यावा लागणार नाही.
तसेच टोलनाक्यावर असलेल्या 300 मीटरपर्यंतच्या पिवळ्या रेषेच्या बाहेर असलेल्या गाड्यांना देखील टोल न घेताच सोडले जाईल असे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे. खरंतर टोल नाक्यावर चार मिनिटांच्या आत टोल रक्कम वसूल झाली नाही तर टोल माफ करण्याची तरतूद आहे.
शिवाय पिवळ्या रेषेच्या बाहेर असलेल्या गाड्यांना देखील टोल माफ करण्याची तरतूद आहे. मात्र हे नियम धाब्यावर बसवले जातात आणि वाहनचालकांकडून सक्तीची टोल वसुली केली जात आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याच नियमांची सरकारला आठवण करून दिली होती.
त्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. या नियमांच्या कडक पालन व्हावे यासाठी आता एमएसआरडीसीकडून राज्यातील सर्व टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेची आखणी केली जात आहे. यामुळे राज्यातील वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळेल असे चित्र तयार होत आहे.
आता टोल संदर्भात असलेले नियम अधिक कटाक्षाने पाळले जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचण्याची शक्यता आहे. दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा सुरु होणार हे मात्र विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या टोलनाक्यासंदर्भातील या भूमिकेवर वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु याची अंमलबजावणी लवकरच झाली पाहिजे आणि वाहन चालकांना दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी देखील नागरिकांकडून यावेळी करण्यात आली आहे.