Maharashtra News : पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन शहरांना राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या तीन शहरांवरून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास मोजला जातो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. मात्र या तीन पैकी एक शहर अजूनही तुलनेने दोन शहरांपेक्षा कमी विकसित भासते. ते म्हणजे नाशिक. विशेष बाब म्हणजे नाशिक ते पुणे दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील मजबूत नाहीये.
स्वातंत्र्याला जवळपास आठ दशकांचा काळ पूर्ण होणार आहे. मात्र तरीही नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही रेल्वे मार्ग तयार झालेला नाही. रेल्वे तर सोडाच पण रस्त्याची देखील दुरावस्था आहे. नाशिक ते पुणे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम केल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे.
यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खरेतर महाराष्ट्रात नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग असून याचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण देखील झाले आहे.
नागपूर ते इगतपुरी यादरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. उर्वरित इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जुलै 2024 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जात आहे.
दुसरीकडे नाशिक ते पुणे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही रखडलेले असल्याने येथील नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. मात्र शासनाने या दोन्ही शहरादरम्यान औद्योगिक महामार्ग तयार करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. 213 किलोमीटर लांबीचा हा औद्योगिक महामार्ग या दोन्ही शहरादरम्यानच्या विकासाला चालना देणार असा दावा होत आहे.
तथापि हा महामार्ग तरी आता प्रत्यक्षात बांधला जाणार का हा मोठा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहे. दरम्यान, शासनाने अधिसूचना काढून पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग ज्या गावातील जमिनीतून जातो त्यांचे जमीन गट नंबर, सर्व्हे नंबर दिलेले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड, रांजणगाव, शिरूर परिसर तसेच चाकण औद्योगिक वसाहत, नाशिक येथील औद्योगिक वसाहत व कंपन्यांतील उत्पादित माल, शेतीमाल वाहतूक, प्रवासी वाहतुकीचा विचार करूनच या नवीन औद्योगिक महामार्गाची संकल्पना शासनाने आणली आहे.
या मार्गामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांचा एकात्मिक विकास सुनिश्चित होऊ शकतो अस बोललं जात आहे. यामुळे कृषी, शिक्षण, पर्यटन, उद्योग अशा विविध क्षेत्रांना मोठी उभारी मिळणार अशी आशा आहे. या मार्गामुळे पुणे ते नाशिक यादरम्यानचे प्रवासाचे अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.
नाशिक ते पुणे हा प्रवास हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर फक्त तीन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या मार्गामुळे चाकण, राजगुरुनगर मार्गे थेट शिर्डीला जाणे प्रवाशांना शक्य होईल असे म्हटले जात आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव २०२३ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता.
या महामार्गाचा आराखडा देखील तयार असून तो पीडब्ल्यूडी विभागासमोर सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाला मान्यताही देण्यात आली आहे. यामुळे या महामार्गाचे तरी काम जलद गतीने होईल आणि नाशिकसहित अहमदनगरच्या विकासाला सुद्धा चालना मिळेल अशी आशा आहे.