Maharashtra News : आज शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने या दोन्ही योजने संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना आता पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. याआधी दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे.
परंतु आता दर पाच वर्षांनी एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज 28 जून 2023 रोजी राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन रकमेत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रति महिना पेन्शन दिली जात आहे. मात्र आता 1500 रुपये एवढी पेन्शन लाभार्थ्यांना मिळणार आहे. निश्चितच या निर्णयामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संजय गांधी निराधार योजना काय आहे?
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना 1000 रुपये एवढे पेन्शन दिले जात होते मात्र आता यापुढे 1500 रुपये एवढे पेन्शन दिले जाणार आहे.
श्रावण बाळ योजना काय आहे?
ही योजना निराधार व्यक्तींसाठी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून मासिक एक हजार रुपये एवढं पेन्शन दिले जात होतं मात्र आता यापुढे या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये एवढे पेन्शन दिले जाणार आहे.