Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून मिरची टोमॅटो समवेतच सर्व भाजीपाल्याचे दर तेजीत आले आहेत.
यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात शेतमाल विकला जात असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशातच कांद्याच्या बाजारभावात देखील आता विक्रमी वाढ झाली आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास पाच ते सहा महिन्यांच्या काळात कांदा मात्र दोन रुपये प्रति क्विंटल ते पाच रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला.
परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नाही. अनेकांना तर कांदा वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील मिळाला नाही. पण आता परिस्थिती बदलली असून जुलै महिन्यात कांद्याच्या दरात चांगली तेजी पाहायाला मिळत आहे.
आज कांदा बाजारभावाने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून दरातील ही तेजी आगामी काही दिवस अशीच कायम राहील असं चित्र आता तयार होत आहे.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 258 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 3 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज नागपूर एपीएमसीमध्ये पांढऱ्या कांद्याला 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 2450 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी तर नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 22000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला 2601 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1400 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.