Maharashtra Police News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून नियुक्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना प्रति महिना वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
दरम्यान आता शिक्षकांपाठोपाठ राज्यात पोलीसही कंत्राटी बनणार आहेत. राज्यातील पोलीस दलात देखील कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलात ही नियुक्ती होणार आहे. गृह खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर मुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. मुंबई पोलीस दलात शिपाई पासून ते पोलीस सहायक निरीक्षकापर्यंत एकूण 40 हजार 623 पदे आहेत. यापैकी जवळपास दहा हजार पदे ही रिक्त आहेत. हजारो पदे रिक्त असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाचा हा वाढता बोजा कमी व्हावा म्हणूनचं मग पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून गृह विभागाकडे कंत्राटी भरतीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
आयुक्तांनी यासाठी गृह विभागाकडे विनंती केली होती. या विनंतीवर गृह विभागाने सकारात्मकता दाखवली आहे आणि हा निर्णय घेण्यात आला आहे. ही भरती राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केली जाणारा असून ही भरती अकरा महिन्यांसाठी होणार आहे.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यावर आधीच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता गृह विभागाने मुंबई पोलीस दलात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याने यावर आता वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे.
कंत्राटी पोलिसांची गरज का?
राज्य सरकारने 2021 च्या सुरुवातीला 776 शिपाई आणि 994 वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन आणि शिपाई प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. म्हणजेच दोन वर्षानंतर हे शिपाई सेवेत रुजू होणार आहेत.
अशा परिस्थितीत तोपर्यंत मनुष्यबळाची गरज आहे. यामुळे आयुक्तांनी गृह विभागाकडे कंत्राटी पोलीस भरतीसाठी विनंती केली होती. याच विनंतीनुसार आता गृह विभागाकडून 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलीस भरती होणार आहे.