Maharashtra Railway News : येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध विकासाचे कामे शासन जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध रेल्वेमार्गावर वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू केल्या जात आहेत. आतापर्यंत केंद्र शासनाने 18 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. विशेष बाब अशी की, 27 जूनला म्हणजेच येत्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी आणखी नवीन पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.
एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. या पाच गाड्यांमध्ये मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश राहणार आहे. मुंबई-गोवा व्यतिरिक्त बंगळुरू ते धारवाड, पटना-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ ते जबलपूर या मार्गावरही ही हाय स्पीड ट्रेन मंगळवारी सुरु होणार आहे.
निश्चितच, रेल्वेच्या या निर्णयामुळे संबंधित रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण एकीकडे भारतीय रेल्वे देशभरातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू करत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या मार्गावर सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस मात्र बंद करण्याचा निर्णय रेल्वे घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडेच, रेल्वेने नागपूर ते बिलासपूर मार्गावर धावणारी वंदे भारत बंद केली. रेल्वेच्या या निर्णयाबाबत असं सांगितलं जात आहे की, प्रवाशांच्या कमतरतेमुळे या मार्गावरील ही सेमी हायस्पीड ट्रेन रद्द करावी लागली आहे.
दरम्यान, रेल्वे बोर्डाने या संदर्भात एक सूचना जारी केली आहे. या जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वंदे भारत ट्रेनचा रेक तेजस एक्सप्रेसने बदलण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सप्टेंबर 2022 मध्ये नागपूर ते बिलासपुर या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली होती. पण आता या मार्गावरील वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या कमतरतेमुळे बंद करण्याचा निर्णय झाला आहे.