Maharashtra Rain : यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच मान्सून कमकुवत आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने देखील अपेक्षित प्रमाणात हजेरी लावलेली नाही. म्हणून एल निनोमुळे यंदा कमी पाऊस होणार असा अंदाज काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थानी व्यक्त केला आहे.
पण भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो सक्रिय असतानाही सरासरी एवढा पाऊस पडेल असं सांगितलं आहे. मात्र असे असेल तरी यंदा मान्सून खूपच विलंबाने भारताच्या मुख्य भूमीत आला, मान्सून दाखल झाल्यानंतरही देशात सुरुवातीच्या टप्प्यात खूपच कमी पाऊस पडला.
जुनअखेर पावसाची तीव्रता वाढली. महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर जून महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील इतरही भागात पावसाची हजेरी लागली. त्यामुळे पेरणीच्या कामाने महाराष्ट्रात गती पकडली. राज्यातील बहुतांशी भागात आता पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
पण ज्या ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथे पेरणी बाकी आहे. अशातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. कोकण, मुंबई, पुणे, अहमदनगर, नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.
दरम्यान हवामान विभागाने आज अर्थातच 13 जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच काही जिल्ह्यात आज पावसाची उघडीप राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. चला तर मग कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाची विश्रांती असेल याविषयी जाणून घेऊया.
या जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. या जिल्ह्यात आज पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
पण आज 13 जुलै रोजी राज्यातील सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच हवामान विभागाने 15 जुलै पर्यंत अंशता ढगाळ हवामान राहणार आणि 16 व 17 जुलै रोजी राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 22 जुलै पर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता राहणार आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार नाही परंतु शुक्रवारी जोरदार पाऊस पडू शकतो.