Maharashtra Rain Alert : 10 सप्टेंबर पासून सुट्टीवर गेलेला मान्सून पुन्हा एकदा परतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.
शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची आतुरता लागून आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचेच पाहायला मिळत आहे. खरंतर मान्सूनचा साडेतीन महिन्यांचा काळ उलटला आहे. या साडेतीन महिन्यांमध्ये जुलै महिन्यातील काही काळ वगळता अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून ते आत्तापर्यंत राज्यात फक्त 30 दिवस पावसाची हजेरी लागली आहे. तर काही भागात मोठा पाऊसच झालेलाच नाही अशी बिकट परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे बोलले जात आहे.
जर आगामी काळात चांगला जोरदार पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रावर मोठे पाणी संकट येणार आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पण अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे.
हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज 16 सप्टेंबर शनिवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन ते चार तासात राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे.
आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अर्थातच खानदेशमधील जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तिन्ही जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे. यासोबतच आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर आणि कोकणातील दक्षिण भागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निश्चितच जर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
त्यामुळे खरिपातील पिकांना पुन्हा एकदा नवीन संजीवनी मिळणार असे सांगितले जात आहे. जर या महिन्यात चांगला पाऊस झाला तर आगामी रब्बी हंगामात या पावसाचा फायदा होणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
खरतर रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. आता अनेक भागात रब्बी हंगामातील कोरडवाहू ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. याशिवाय पुढल्या महिन्यात गव्हाच्या पेरणीसाठी पूर्व मशागत करण्याच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत आता जोरदार पाऊस पडणे अपेक्षित आहे.