Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर गेलेला मान्सून कालपासून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. विशेषता कोकणात दोन दिवसांपूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे.
मात्र राज्यातील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात कालपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र पावसाचा जोर अजूनही वाढलेला नाही. राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.
पण सध्या स्थितीला दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला जर या दुष्काळी परिस्थितीतून बाहेर निघायचे असेल तर मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्याने जर पावसाची सरासरी भरून निघायची असेल तर उर्वरित मान्सून काळात आणि परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगला होण गरजेचे आहे.
यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या आभाळाकडेच नजरा आहेत. सध्या काही भागात हलका पाऊस पडत आहे मात्र तरीही शेतकरी बांधव मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.
हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे आज 16 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने संबंधित भागाला रेड अलर्ट जारी केला आहे.
यामुळे या संबंधित भागातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहून आपली कामे करावी लागणार आहेत. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज पासून पावसाचा मोठा जोर वाढणार असा अंदाज असेल.
आगामी चार-पाच दिवस पावसाचेच राहणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे यामुळे या भागाला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागासाठी आज येलो अलर्ट जारी झाला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असा अंदाज आहे. तसेच मुंबई आयएमडीने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे.
तर उत्तर महाराष्ट्रा सुद्धा आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या यामुळे आशा पल्लवीत होणार आहेत. परंतु अतिवृष्टीची शक्यता असल्याने मध्य महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सावधगिरीने आपली कामे करायची आहेत.