Maharashtra Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जस की आपण बघतोय की, राज्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलत आहे. यामुळे हे सध्याचे हवामान शेतकऱ्यांची चिंता वाढवू लागले आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस राज्यात थैमान घालत आहे. अवकाळी पावसाने आणि गेल्या महिन्यात काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अक्षरशा तोंडचे पाणी पळवले आहे.
अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक पावसामुळे वाया गेले आहे. अनेकांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे आणि ढगाळ हवामानाचे सावट अजूनही राज्यावर कायमच आहे.
भारतीय हवामान विभागाने 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाच ते सहा डिसेंबर पर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होईल असा अंदाज आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र अवकाळी पाऊस थांबणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ हवामान पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र आणि खानदेश मधील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून अवकाळी पावसाचे वातावरण निवळणार आहे आणि त्या ठिकाणी देखील स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात मात्र चार आणि पाच डिसेंबर रोजी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता राहणार आहे. या भागात 6 डिसेंबर पासून अवकाळी पावसाची उघडीप पाहायला मिळणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज आहे.
विदर्भ विभागात देखील मराठवाड्याप्रमाणेच तीन, चार आणि पाच डिसेंबरला ढगाळ हवामानासह काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सहा डिसेंबर पासून मात्र विदर्भात देखील हवामान कोरडे राहणार आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवणार असा अंदाज आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
सहा डिसेंबर पासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे होणार असल्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार असल्याने हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरेल आणि पिकांची चांगली जोमदार वाढ होईल असे मत आता व्यक्त होऊ लागले आहे.