Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यातील बहुतांशी भागात आता जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. गेल्या जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला. मागील महिना जवळपास कोरडाच गेला. आता जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे.
या महिन्यातही सुरुवातीचे चार दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप पाहायला मिळाली आहे. यामुळे खरीप हंगाम संकटात आला आहे. अजूनही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पेरणी पूर्ण झालेली नाही. तसेच ज्या भागात पेरणी झाली आहे तेथील पिके जोरदार पाऊस होत नसल्याने संकटात आली आहेत.
शेतकरी बांधव सांगताय की, याआधी देखील अशीच परिस्थिती अनेकदा पाहायला मिळाली आहे. मृगाचा पाऊस पडला नाही तर आषाढी एकादशीपर्यंत हमखास पाऊस पडत असे. यंदा मात्र आषाढी एकादशी देखील निघून गेली आहे. तरीही जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. इतरत्र पाऊसच पडत नाहीये.
यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच आज पाच जुलै रोजी कोकणात आणि घाटमाथ्यावर आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 26 जिल्ह्यात आज पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. आज हवामान विभागाने कोकणातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
आज राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पालघर, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.