Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेची काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी 48 तास राज्यात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे. खरंतर, डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे.
या कालावधीत दरवर्षी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. यंदा मात्र थंडी जणू गायबचं झाली आहे. सध्या राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि त्यानंतर तयार झालेले चक्रीवादळ यामुळे सध्या राज्यात पाऊस सुरू आहे. मिचाँग या चक्रीवादळाचा देशातील दक्षिणेकडील राज्यांना मोठा फटका बसत आहे.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे वादळी पाऊस सुरू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि वित्तहानी झाली आहे. सर्वसामान्य जनजीवन वादळी पावसाने विस्कळीत झाले आहे.
सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेन्नईमध्ये तर वादळी पावसामुळे पूरस्थिती तयार झाली आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. पुराचे पाणी घरात शिरले आहे.
विशेष म्हणजे या चक्रीवादळाचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावरही दिसू लागला आहे. चक्रीवादळामुळे राज्यात केल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आणि हलका पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाने देखील जरी लावली आहे.
दरम्यान आगामी 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने आज अर्थातच 7 डिसेंबर आणि उद्या 8 डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज बांधला आहे.
जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. आज गुरुवारी पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ विभागातील पूर्वेकडे वसलेल्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे आज ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज हवामान खात्याने यासंबंधीत जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
तसेच उद्या अर्थातच शुक्रवारी मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.