Maharashtra Rain Alert : सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. आपल्या राज्यातही गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे फारशी थंडी पाहायला मिळाली नाही.
मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने आणि जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश मध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडत आहे. याशिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. यामुळे सकाळी सकाळी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
कामासाठी जाताना नागरिक स्वेटर, मफलर सारखे उबदार कपडे परिधान करून निघत आहेत. दरम्यान उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर यांसारख्या डोंगराळ भागात सध्या बर्फवृष्टी होतेय. यामुळे या संबंधित भागांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने मोठा उत्साह आहे.
मात्र याचा तिथे राहणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होत आहे. अशातच मात्र देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असा अंदाज आहे. महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस वायव्य भारतात सकाळी दाट धुके पडण्याचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशसह उत्तर-पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय दक्षिण तामिळनाडूमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. खरे तर तामिळनाडूमध्ये आधी देखील मुसळधार पाऊस झाला आहे. आता तिथे पावसाची तीव्रता कमी झाली असून गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती देखील पूर्वपदावर आलेली आहे.
मात्र तामिळनाडू राज्यावरील पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही. कारण की तामिळनाडू सहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे थरथरणाऱ्या थंडीत आता पाऊस रेनकोट घालायला लावणार की काय असा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे ऐन हिवाळ्यात बरसणारा हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांची अडचण वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर-पश्चिम भारताला धडकणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
आय एम डी ने संबंधित राज्यांना पावसाचा इशारा जारी केला आहे. IMD म्हणतंय की, ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्येपाऊस पडणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस बरसणार आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडणार असे बोलले जात आहे. तसेच तामिळनाडूमधील काही भागात 30 आणि 31 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.