Maharashtra Rain Alert : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार मोसमी पाऊस कोसळत आहे. यामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील उकाड्याने त्रस्त जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच पावसाचे जोरदार आगमन झाले असल्याने आता शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबगही वाढली आहे. शेतकरी बांधव आता खरीप हंगामातील पेरणीसाठी पुढे सरसावले आहेत. एकूणच काय पावसाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. काल राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
मराठवाड्यातही काही भागात पावसाच्या सऱ्या बरसल्या आहेत. दरम्यान आज 28 जून रोजी भारतीय हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
निश्चितच राज्यात आता मोसमी पाऊस सक्रिय झाला असल्याने पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. मात्र पेरणी करताना किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला तरच पेरणी करावी असा सल्ला यावेळी कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आता आपण भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे याबाबत जाणून घेऊया.
आज कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 28 जून रोजी कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे.
तसेच राजधानी मुंबईसह कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांसाठी देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.